Rajasthan News: कोटपुतलीत मोठी ड्रग्ज कारवाई! ४९,८१६ ट्रामाडोल कॅप्सूल जप्त, किराणा दुकानार आणि डॉक्टरला अटक
जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी आणि बेकायदेशीर ड्रग्जविरोधात राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत कोटपुतली पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल ४९,८१६ ट्रामाडोल कॅप्सूल आणि अनेक अंमली पदार्थांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या ड्रग्जची किंमत अंदाजे १० लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका किराणा दुकानाच्या मालकाला आणि एका डॉक्टरला अटक केली आहे.
![]()
(फोटो सौजन्य शटरस्टॉक)
किराणा दुकानातून ड्रग्ज जप्त
पोलीस अधीक्षक देवेंद्र सिंग यांच्या माहितीनुसार, मनोज कुमार जाट हा ट्रान्सपोर्ट नगर, कोटपुतली येथील लोहार छावणीजवळील किराणा दुकानाच्या नावाखाली बेकायदेशीर ट्रामाडोल कॅप्सूल विकत होता. पोलिसांनी मनोजच्या दुकानावर छापा टाकून ४८,५१६ कॅप्सूल जप्त केले. मनोजला अटक करण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य फ्रिपीक)
डॉक्टरच्या क्लिनिकवरही छापा
कोटपुतलीतील डॉक्टर अविनाश शर्मा यांच्या क्लिनिकवरही छापा टाकण्यात आला. तिथून १२४० ट्रामाडोल कॅप्सूल आणि इतर ड्रग्ज जप्त करण्यात आले. डॉक्टर अविनाशला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किराणा दुकान आणि क्लिनिकच्या माध्यमातून बेकायदेशीर ड्रग्जचा व्यवसाय करत होते. तरुणांना हे ड्रग्ज पुरवले जात होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवायीत आणखी लोकांचा सहभाग असू शकतो, ज्यांची तपासाद्वारे ओळख पटवली जात आहे.
एनडीपीएस कायद्यांतर्गत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार बिश्नोई म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर ड्रग्ज विक्रेत्यांना माफ केले जाणार नाही. आमची मोहीम सातत्याने सुरूच राहील.”
