नागपूरमध्ये हवाल्याच्या व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची रोकड लुटली; पाठीत दोन गोळ्या झाडल्या
नागपूर: हवाल्याचा मोठा व्यवहार करणाऱ्या धान्यव्यापारी राजेंद्र दिपानी यांच्यावर नागपूरच्या जरिपटका भागात रात्री ९ वाजेच्या सुमारास धक्कादायक हल्ला झाला. ५० लाख रुपयांची रोकड लुटून दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे दिपानी यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या.

जरिपटका येथील कडवी चौकाजवळील १० नंबर पुलिया परिसरात ही भीषण घटना घडली. रोजच्या आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन घरी निघालेल्या दिपानी यांच्यावर अंधारात दोन व्यक्तींनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी अंदाजे तीन गोळ्या झाडल्या, त्यात दोन गोळ्या थेट दिपानी यांना लागल्या.
घटना एवढी वेगाने घडली की हल्लेखोरांनी ५० लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. दिपानी यांनी सुरुवातीला २ लाख, नंतर ५ लाख, आणि अखेरीस ५० लाख रुपयांची रोकड लुटली गेल्याची माहिती दिली आहे.
जखमी अवस्थेत दिपानी यांना प्रथम अभिनव रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथून त्यांना गंभीर प्रकृतीत मॅक्स मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी तत्काळ न्यायवैद्यक टीमसह घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस पथकांना अलर्ट जारी केला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
हा हल्ला का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपानी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे हल्लेखोरांना आधीपासूनच माहिती होते. नागपूरतील हवाल्याच्या या व्यापाऱ्यावर झालेल्या या दहशतीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
