Jolly Llb 3 Trailor Out: ‘जॉली एलएलबी ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित! शेतकऱ्यांच्या लढ्याची कथा उलगडणार
प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा असलेला ‘जॉली एलएलबी ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या लढ्याची कथा
३ मिनिटे ५ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक मोठा बिझनेसमन (गजराज राव) शेतकऱ्यांची जमीन बळकावतो, आणि त्याच्या विरोधात कोर्टात लढण्याची जबाबदारी येते जॉलीवर. अर्शद वारसी शेतकऱ्यांचा वकील, तर अक्षय कुमार विरोधी बाजूचा वकील म्हणून झळकतो.

(फोटो: जॉली एलएलबी 3 पोस्टर इंस्टाग्राम)
दमदार स्टारकास्ट
चित्रपटात गजराज राव एक वेगळाच अंदाज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याची नकारात्मक भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. हुमा कुरेशी* अक्षयची पत्नी, तर अमृता राव अर्शदच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सौरभ शुक्ला, सीमा बिस्वास, आणि संजय मिश्रा यांसारखे प्रतिभावान कलाकार देखील प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोर्टरूम ड्रामा, सामाजिक संदेश, आणि जबरदस्त अभिनय यांचा संगम असलेला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर धुमाकुळ घालेल अशी आशा आहे.
