प्रियदर्शनच्या ‘हैवान’मध्ये मोहनलालचा कॅमिओ
दिग्दर्शक प्रियदर्शन सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘हैवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या थ्रिलरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालचा एक खास कॅमिओ असल्याची पुष्टी खुद्द दिग्दर्शकांनी केली आहे. प्रियदर्शन यांनी सांगितले की, “हो, मोहनलाल ‘हैवान’मध्ये आहे. तो कोणती भूमिका साकारणार हे मी सध्या उघड करू शकत नाही. माझ्यासाठी कथेचा आत्मा महत्वाचा असतो, कलाकार नंतर.” ते पुढे म्हणाले, “मी कधीच फक्त कलाकार लक्षात घेऊन चित्रपट बनवत नाही. पटकथा आधी, कलाकार नंतर. जेव्हा योग्य कथा मिळते, तेव्हाच योग्य कलाकारांसोबत काम होते.”
‘हैवान’ हा २०१६ साली आलेल्या मोहनलालच्या सुपरहिट मल्याळम थ्रिलर ‘ओप्पम’ या चित्रपटावर आधारित असेल. हैवानमध्ये थरार, ड्रामा आणि जबरदस्त अॅक्शन यांचा तडका असणार आहे. थेस्पियन फिल्म्स आणि केव्हीएन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात अक्षय आणि सैफशिवाय समुथिरकानी, सैयामी खेर, श्रिया पिळगावकर आणि असरानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अक्षय कुमार, सैफ अली खान आणि सैयामी खेर यांनी नुकतेच चित्रपटाचे आउटडोअर चित्रीकरण पूर्ण केले आहे. हैवान २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

