Crime in Mumbai: मुंबईत बॅनर लावण्याच्या वादातून रिक्षा चालकाच्या घराला आग, पोलीसांकडून तपास सुरु

(फोटो सौजन्य फ्रिपीक)
मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात महापुरुषांच्या फलकावर अनधिकृत बॅनर्स लावल्याचा विरोध केल्यामुळे एका रिक्षा चालकाच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वर्षांनगर येथील पार्कसाईट भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी या भागातील एका चौकाला महापुरुषाचे नाव देऊन लोखंडी फलक लावण्यात आला होता. परंतु काही अज्ञात व्यक्तींनी त्या फलकावर अनधिकृतपणे सणाचे बॅनर्स लावले होते.
सदर रिक्षा चालकाने या बॅनर्स लावण्याला विरोध दर्शवत, पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आणि बॅनर्स हटवण्याची मागणी केली. यावरून काही तरुणांनी त्याच्याशी वाद घातला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव थांबवला.
त्यानंतर काही दिवसांनी अज्ञात व्यक्तींनी रिक्षा चालकाच्या घराला आग लावली. घरातील सदस्यांनी तत्काळ आग विझविल्यामुळे मोठा अपघात टळला. पार्कसाईट पोलिसांनी तक्रार नोंदवत, आरोपींच्या शोधासाठी आणि या गंभीर घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
