सबा आझादला साकारायचीय आव्हानात्मक भूमिका
बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री सबा आझाद ही अभिनयातील विविधतेसाठी ओळखली जाते. प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून देणाऱ्या या अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासाविषयी, कुटुंबीय दृष्टिकोनाविषयी आणि इंडस्ट्रीमधील टाइपकास्टिंगबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.

ती म्हणाली, “माझ्यासारख्या व्यक्तीची भूमिका साकारण्यात फारसा बदल करावा लागत नाही, पण एखाद्याच्या आयुष्याचा भाग होणे, त्यांच्या जगात प्रवेश करणे मला जास्त आवडते”. पुढे ती म्हणाली, “मला अशा महिला व्यक्तिरेखा साकारायला आवडतात ज्या स्वतःचे स्थान धाडसाने निर्माण करतात.

हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असलेली सबा लग्नाच्या प्रश्नांवर उत्तर देत म्हणाली, “मी अशा कुटुंबात वाढले जिथे लग्न ही जीवनातील गरज नाही, हा विचार मला लहानपणापासूनच दिला गेला. त्यामुळे माझ्यावर कधीच लग्नासाठी दबाव टाकण्यात आला नाही” टाइपकास्टिंगवर बोलताना ती म्हणाली, “लोक मला विचारतात, ‘तुला हिंदी बोलता येते का?’ ही एक विचित्र गोष्ट आहे. टाइपकास्टिंगमुळे अनेकदा आपण मर्यादीत राहतो आणि कलाकार म्हणून तुम्हाला हवी असलेली संधी मिळत नाही. सबाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच “सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज” या चित्रपटात दिसली होती, ज्यात सोनी राजदान यांची प्रमुख भूमिका होती. आता ती लवकरच अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’ या चित्रपटात दिसणार असून, बंदरची टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्क्रीनींग होणार आहे.
