‘रंगीला’ पुन्हा येतोय रुपेरी पडद्यावर; ४K डॉल्बी तंत्रज्ञानासह होणार प्रदर्शित
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित आणि आमिर खान, जॅकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर यांच्या अभिनयाने सजलेला सुपरहिट चित्रपट ‘रंगीला’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट ४K डॉल्बी फॉर्मॅटमध्ये अधिक रंगतदार आणि नव्या शैलीत प्रदर्शित होणार आहे.

(फोटो रंगीला पोस्टर सौजन्य: एक्स)
या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३० वर्ष झाले आहे. ८ सप्टेंबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता नव्या तंत्रज्ञानासह पुन्हा थिएटरमध्ये झळकणार असल्याची माहिती राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, “रंगीला ४K डॉल्बीमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे!”
‘रंगीला’ची कथा काय आहे?
‘रंगीला’ ही प्रेमाच्या त्रिकोणात गुंफलेली एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. मुन्ना (आमिर खान) दिलदार, पण प्रेमात गोंधळलेला तरुण असतो. मिली (उर्मिला मातोंडकर) अभिनेत्री व्हायचे स्वप्न पाहणारी तरुणी असते. तर राज कमल (जॅकी श्रॉफ) सुपरस्टार अभिनेता असतो, जो मिलीच्या आयुष्यात नवे वळण घेऊन येतो. या तिघांची नाती, संघर्ष, आणि प्रेमाचे गुंतागुंत, आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

‘रंगीला’ म्हणजे संगीताची पर्वणी!
ए.आर. रहमान यांचे संगीत, आणि ‘तन्हा तन्हा’, ‘रंगीला रे’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटासाठी रहमान यांनी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, राम यांनी सर्वोत्कृष्ट कथा, आणि जॅकी श्रॉफने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. रंगीलाच्या पुनर्प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
