अक्षय म्हणाला, जे बिग बीही जे करू शकले नाही, ते मी कसे करू?
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आजपर्यंत विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण त्याने साकारलेली ‘ओह माय गॉड’मधील श्रीकृष्णाची भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिली आहे. मात्र तुम्हाला माहिती नसेल की, अक्षयने ही भूमिका साकारायला सुरुवातीला नकार दिला होता.
चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत उघडपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, “अक्षय कुमार या चित्रपटात देवाची भूमिका साकारण्यास तयारच नव्हता. त्याला वाटत होते, जर अमिताभ बच्चन यांनी ‘गॉड तुसी ग्रेट हो’सारख्या चित्रपटात देवाची भूमिका साकारूनसुद्धा चित्रपट चालला नाही, तर मी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना कशी आवडेल?”
उमेश शुक्ला पुढे म्हणाले, “मी त्याला समजावले की आपले सादरीकरण वेगळे आहे. या चित्रपटात देव बाईक चालवताना, लॅपटॉप वापरताना दिसणार आहे. हा दृष्टिकोनच वेगळा आहे.” यानंतर अक्षय कुमारने त्यावर आधारित नाटक पाहिले आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून तो तयार झाला. त्याला कथानक आवडले आणि त्याने चित्रपट स्वीकारला. पुढे ते म्हणाले की, “चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, अक्षय, परेश आणि मला धमक्याही मिळत होत्या. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला उचलून धरले आणि सर्व गैरसमज दूर झाले.”
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओह माय गॉड’ चित्रपट प्रचंड हिट ठरला. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर ‘ओएमजी 2’देखील प्रदर्शित झाला, आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
