‘फुल प्लेट’ने सिडनी इंडियन फिल्म फेस्टिव्हलला होणार धमाकेदार सुरुवात
तनिष्ठा चॅटर्जी दिग्दर्शित ‘फुल प्लेट’ या चित्रपटाने सिडनी इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२५ ची सुरुवात होणार आहे. ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसांच्या महोत्सवात भारतातील आणि भारतीय डायस्पोरा सिनेमाचे सुंदर दर्शन घडणार आहे.
कीर्ती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात शरीब हाश्मी, मोनिका डोगरा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता.
‘फुल प्लेट’ची कथा मुंबईतील एका मुस्लिम गृहिणीभोवती फिरते. पतीच्या अपघातामुळे उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्यावर येते आणि त्यातून तिचे भावनिक व वैयक्तिक परिवर्तन घडते.
तनिष्ठा चॅटर्जी या चित्रपटाविषयी म्हणाल्या, “हे चित्रपट माझ्या आयुष्यातील कठीण काळात जन्माला आले. ‘फुल प्लेट’सारख्या संघर्ष आणि आशेच्या कहाणीने सिडनी फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात होणे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”
महोत्सवात १५ हून अधिक विविध भाषांतील व शैलीतील चित्रपट, लघुपट, माहितीपट, प्रश्नोत्तर सत्रे आणि चित्रपट निर्मात्यांसोबत थेट संवाद अशा अनेक गोष्टींचा अनुभव सिडनीकर प्रेक्षकांना मिळणार आहेत.
भारतीय चित्रपटांचे सशक्त व्यासपीठ असलेला सिडनी इंडियन फिल्म फेस्टिव्हल पुन्हा एकदा सिनेप्रेमींना विचार करायला, अनुभवायला आणि प्रेरणा द्यायला सज्ज आहे.
