जुनैद खान, साई पल्लवीचा ‘मेरे रहो’ १२ डिसेंबरला चित्रपटगृहात; बॉक्स ऑफिसवर डिसेंबरमध्ये तगडी टक्कर!
आमिर खान प्रॉडक्शन निर्मित जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मेरे रहो’ हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या घोषणेमुळे या चित्रपटाभोवती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. याआधी चित्रपटाचे नाव ‘एक दिन’ असल्याची चर्चा होती आणि तो ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता सर्व काही स्पष्ट झाले आहे.
जपानी बर्फाच्छादित पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकथा!
सुनील पांडे दिग्दर्शित ‘मेरे रहो’ ही कथा जपानमधील साप्पोरो स्नो फेस्टिव्हलवर आधारित आहे. २०२४ च्या सुरुवातीला तिथे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण करण्यात आले. बर्फवृष्टीमुळे अडचणी आल्या, पण चित्रपटाच्या चमुने तग धरत चित्रीकरण यशस्वीपणे पुर्ण केले.
जुनैद खानसाठी मोठी संधी!
‘महाराज’ या चित्रपटातून ओटीटी पदार्पणानंतर आणि ‘लव्हयापा’ला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर, ‘मेरे रहो’ हा जुनैदचा दुसरा थिएटर रिलीज चित्रपट असणार आहे. तर साई पल्लवीसारखी लोकप्रिय अभिनेत्री सोबत असल्याने, हा चित्रपट जुनैदसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो.
डिसेंबरमध्ये होणार मोठी टक्कर!
‘मेरे रहो’ डिसेंबरच्या स्पर्धात्मक काळात प्रदर्शित होत आहे. याच काळात रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ आणि शाहिद कपूर, तृप्ती दिमरी अभिनीत विशाल भारद्वाज यांचा रोमियोही झळकणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठा सामना पाहायला मिळणार हे निश्चित!
