46 Crore Income Tax Notice to Dhaba Cook: ढाब्यावरील स्वयंपाक्याला आली ४६ कोटींची आयकर नोटीस; नेमकं प्रकरण काय?

(फोटो सौजन्य आयस्टॉक)
46 crore income tax notice to dhaba cook: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या रविंदर सिंह चौहान यांना अचानकच ४६ कोटी रुपयांची आयकर नोटीस आली आहे. या प्रचंड रकमेमुळे चौहान गोंधळून गेले आहे आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
चौहान यांनी सांगितले, “मी एका ढाब्यावर स्वयंपाकी आहे. माझ्या खात्यावर वर्षभरात तीन लाख रुपयांचेही व्यवहार होत नाहीत, मग ४६ कोटी कसे येतील?”
त्यांनी पुढे सांगितले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये ते ग्वालियर बायपासवरील एका टोल प्लाझा येथे मदतनीस म्हणून काम करत होते. तेव्हा सुपरवायझरने त्यांना बँक खाते व आधार कार्डाचे डिटेल्स प्रोव्हिडंट फंडसाठी विचारले. चौहान म्हणाले, “मला माझ्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे सहावी नंतर शाळा सोडावी लागली. मला काहीही माहित नाही.”
आयकर विभागाने ९ एप्रिल २०२५ रोजी त्यांना नोटीस पाठवली होती, पण इंग्रजी येत नसल्यामुळे चौहान आणि त्यांच्या पत्नीने ती दुर्लक्षित केली. २५ जुलै रोजी दुसरी नोटीस आली, त्यानंतर चौहानांनी प्रकरण गांभीर्याने घेतले.
आयकर विभागाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी चौहान यांच्या नावावर ४६ कोटींचे उत्पन्न दाखल केले गेले होते, जे त्यांनी लपवले आहे.
चौहान म्हणाले, “हे खाते मी बंद करण्यासाठी विनंती केली होती, पण कोणीतरी त्याचा गैरवापर करत होता.” त्यांनी पोलीसात तक्रार केली आहे, पण पोलिसांनी सांगितले की गुन्हा दिल्ली येथे घडला आहे, त्यामुळे तिथे तक्रार करावी लागेल.
आता चौहान आणि त्यांचे वकील पुढील कायदेशीर उपाययोजना करत आहेत. आयकर विभागाच्या या मोठ्या नोटीसमुळे हा प्रकार चर्चेत आला आहे.
