ऑस्ट्रेलियाच्या स्टार ऑलराउंडरच्या आयुष्याची नवी इनिंग

३ सप्टेंबर २०२५ रोजी मार्कस स्टोइनिसने आपल्या प्रेमाची शाश्वत ओळख करून दिली. जोडीदार सारा जार्नुकशी विवाहबंधनात अडकून, त्यांनी आपल्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. साराने इंस्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट करत लिहिले, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात सहज हो म्हणाले.”
स्पेनच्या किनाऱ्यावर रोमँटिक बोटीवर बसून स्टोइनिसने साराला प्रपोज केले, ज्यामुळे दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
बराच काळ प्रेमसंबंध
स्टोइनिस आणि सारा जार्नुक यांचे प्रेम जगापासून लपलेले नव्हते. अनेक वर्षे एकत्र असलेलं हे जोडपं स्टेडियमपासून सोशल मीडियापर्यंत एकत्र दिसत असे. सारा ही ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि फॅशन डिझायनर असून तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

(फोटो – इन्स्टाग्राम)
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
२०२५ मध्ये मार्कसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये सुरू झालेली त्याची एकदिवसीय कारकीर्द यशस्वी ठरली, ज्यात ७१ सामन्यांत १,४९५ धावा आणि ४८ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. २०२३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला स्टोइनिस आता पूर्णपणे टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.

