“अर्शदीपसाठी लय शोधणे आव्हान, बुमराहला विश्रांतीची गरज नाही – भरत अरुण”

भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा असा विश्वास आहे की, आगामी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा यश मुख्यत्वे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
अरुण म्हणाले की, “अर्शदीपने इंग्लंडमध्ये सराव सत्रांमध्ये भरपूर गोलंदाजी केली आहे, पण तो स्पर्धात्मक सामन्यांमध्ये थोडा मागे आहे. त्याच्यासाठी लय मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. सरावात नाही, खरा सामना खेळताना खरी लय प्राप्त होते.”
बुमराहसाठी विश्रांती नाही?
भरत अरुणचा असा विश्वास आहे की जसप्रीत बुमराहने या स्पर्धेत सर्व सामने खेळाले पाहिजेत. “माझ्या मते बुमराहला विश्रांती घेण्याची गरज नाही. तो सहा सामने तीन आठवड्यात सहज खेळू शकतो,” असेही अरुण यांनी सांगितले.
हर्षित राणाचे कौतुक, पण सातत्य आवश्यक
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचे भरत अरुण यांनी कौतुक केले आहे. “हर्षित टी-२०मध्ये फार प्रभावी आहे. त्याला स्लोअर बॉल आणि यॉर्कर यामध्ये चांगली पकड आहे. पण सातत्य राखणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

कुलदीप यादवकडून अपेक्षा
इंग्लंड कसोटी मालिकेत अंतिम संघात जागा मिळवू शकलेला नाही, तरीही अरुण यांनी कुलदीप यादववर विश्वास ठेवला आहे.. “कुलदीपने फार मेहनत केली आहे. त्याला संधी मिळाली नाही, पण त्याचा अनुभव आणि टी-२०तला रेकॉर्ड आशावादी आहे. आशिया कपमध्ये तो नक्कीच चमकणार,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
टीमची ताकद
भारताकडे फिरकी गोलंदाजांच्या रूपात तीन जबरदस्त पर्याय आहेत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती. “वरुण टी-२०मधील मॅचविनर आहे, कुलदीपची स्वतःची खासियत, आणि अक्षर गोलंदाजी-फलंदाजी दोन्हीमध्ये उपयुक्त आहे. तिघांनाही एकत्र खेळवणे संघासाठी फायदेशीर ठरेल,” असे अरुण म्हणाले. आशिया कपमध्ये भारतीय गोलंदाजी संघाला विजेतेपदाकडे नेईल, असे भरत अरुण यांचे मत आहे.
